Newsprahar

कोंढवा भागात जड वाहनांचा सुळसुळाट कायम ? कोंढवा बुद्रुक आंबेडकर नगर येथिल बिल्डरच्या खोदकामाचा राडारोडा दिवसा रहिवाशी भागातून.

पुणे प्रतिनिधी : कात्रज-कोंढवा रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अवजड वाहनांना सकाळ-संध्याकाळ बंदी घाला, हा पालकमंत्री अजित पवार यांचा आदेश अजून लाल फितीतच अडकल्याने पुणेकरांचे हाल अजूनही सुरूच आहेत. आता प्रशासनाला हलवण्याचे कामही अजित पवार यांनाच करावे लागेल का, असा सवालही नागरिकांकडून केला जात आहे.

कात्रज-कोंढवा रस्त्यावर होत असलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमी पाहता या भागात अवजड वाहतूक करण्याचे प्रमाण खूप वाढले आहे त्यामुळे अपघातांची संख्याही वाढतच चालली आहे काही दिवसांपूर्वी एका लहान मुलाचा मृत्यू याच अवजड वाहतुकीमुळे झाला आहे तरी देखील कोंढवा वाहतूक पोलीस विभाग डोळे झाकून बसलेले दिसत आहे.

 

कात्रज-कोंढवा रस्त्याकडे कोंढवा वाहतूक पोलिस आणि महापालिका प्रशासनाकडून सपशेल काणाडोळा केला जात आहे. कायम वर्दळ असलेल्या या रस्त्यावर कात्रज ते गोकुळनगर या दरम्यान वाहतूक नियमनासाठी अपवाद वगळता एकही पोलिस कर्मचारी उपस्थित नसतो. अतिक्रमणांकडेही महापालिकेकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे जीवघेण्या रस्त्यावरील वाहतुकीची परिस्थिती आणखी भीषण झाली आहे.

पुणे-बेंगळुरू महामार्ग, मुंबई महामार्ग आणि सोलापूर महामार्ग यांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता अशी ओळख असलेला कात्रज-कोंढवा रस्ता सध्या वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे. आता नागरीकरण वाढल्याने मध्यरात्रीपर्यंतही वाहनांची वर्दळ सुरू असते. महामार्गावरील जड वाहतुकीचे प्रमाणही पूर्वीपासूनच अधिक आहे.

मात्र, येथील रस्त्यात फारसा बदल झालेला नाही. या ठिकाणी विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनचालकांना अटकाव केला जात नाही. रस्त्याच्या कडेला उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांवर कारवाई होत नाही. महापालिकेकडून रस्त्याच्या बाजूला असलेल्या अतिक्रमणांवर कारवाई होत नाही. अरुंद रस्ता, अतिक्रमणे आणि बेशिस्त वाहतून यामुळे रस्ता धोकादायक झाला आहे.

कात्रज कोंढवा रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची वाहतूक खूप वाढली आहे. आता हिच अवजड वाहतूक कमी होते की काय म्हणून कोंढवा बुद्रुक आंबेडकर नगर या भागात एड्रोन बिल्डरनी खोदकाम सुरू केले आहे व या खोदकामातून निघणारे मुरूम डबर इत्यादी मटेरियल हे भर दिवसा रहिवासी भागातून वाहतूक करून स्थलांतरित केले जाते व हा सगळा प्रकार कोणाच्या आशीर्वादाने केला जात आहे? चुकून जर कुठल्याही व्यक्तीची जीवित हानी झाली तर त्याची पूर्णतः जबाबदारी हि या भागात येणाऱ्या ट्रॅफिक पोलीस, एसीपी, डीसीपी यांची व संबंधित अधिकाऱ्यांची राहील का? कारण या बिल्डरला भर दिवसा अवजड वाहतूक करण्यास परवानगी ही या विभागातील ट्रॅफिक पोलिसांनी दिली असल्याचा आरोप या परिसरातील नागरिक करत आहे. ही अवजड वाहतूक बंद करून या बिल्डरला मदत करणाऱ्या संबंधित योग्य ती कडक कारवाई करण्यात यावी अशी नागरिकांची मागणी आहे.