पुणे प्रतिनिधी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील देहूरोड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त मुगुटलाल पाटील यांच्यासाठी लाच मागणाऱ्या व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेनने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. सहायक पोलीस आयुक्त यांच्यासाठी जहांगीर हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये पाच लाख रुपयांची लाच मागून १ लाख रुपयांचा पहिला हप्ता घेताना ओंकार भरत जाधव या व्यक्तीला १७ फेब्रुवारीला ताब्यात घेण्यात आले असून कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, तक्रारदार यांचेविरुद्ध सहायक पोलीस आयुक्त, देहुरोड विभाग येथे कात्रज-कोंढवा बायपास रोड येथील जागेसंबंधात फसवणुकीचा तक्रार अर्ज दाखल केला होता. या अर्जाची चौकशी एसीपी पाटील यांच्याकडे आला होता. यामध्ये तक्रारदार यांचे विरुद्ध भा.दं.वि. कलम 420 प्रमाणे गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि मदत करण्यासाठी ५,००,००० रुपये लाचेची मागणी मुगुटलाल पाटील यांच्या सुचनेवरून ओंकार जाधव यांनी केली होती. याप्रकरणी तक्रारदार यांनी जाधवविरुद्ध तक्रार दिली होती.
या तक्रारीवरून चौकशी केली असता एसीपी पाटीलं यांच्यासाठी ओंकार जाधव या व्यक्तीने ५,००,००० रुपये लाचेची मागणी केल्याचे आढळून आले. एवढेच नाही, तर पहिला हफ्ता म्हणुन १,००,००० रुपये घेताना त्याला एसीबीचे डीवायएसपी नितीन जाधव, पीआय प्रसाद लोणार, सहाय्यक फौजदार, मुकुंद अयाचित, हवालदार चंद्रकांत जाधव आणि पोलिस शिपाई दिनेश माने या पथकाने १७ फेब्रीला पकडले. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध पुण्यातील कोरेगाव पोलिस स्टेशनमध्ये लाचखोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.