पुणे प्रतिनिधी : येरवडा कारागृहातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. येरवडा कारागृहामध्ये एका अधिकाऱ्याला आंदेकर टोळीच्या गुंडांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून कारागृहातील सुरक्षारक्षक आणि अधिकारी देखील सुरक्षित नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. याप्रकरणी १० ते १२ जणांविरोधात येरवडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या घटनेमध्ये कारागृह अधिकारी शेरखान पठाण हे जखमी झाले आहेत. येरवडा कारागृहाचे अधीक्षक सुनील ढमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी दहा ते बारा कैद्यांमध्ये आणि शेरखान पठाण यांच्यामध्ये बाचाबाची झाली होती.
त्यावेळी एकमेकांना शिवीगाळ करण्यात आलेली होती. त्यावरून ही धुसफूस सुरू होती. गुरुवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास पठाण यांच्यावर दहा ते बारा जणांच्या टोळक्याने हल्ला केला. त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. या घटनेची कारागृह प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून पुढील कायदेशीर कारवाई केली जात असल्याचे अधीक्षक ढमाळ यांनी सांगितले.