पुणे प्रतिनिधी : फिर्यादी यांचेवर पाळत ठेवुन त्यांचे दुचाकीच्या डीकीमधुन रोख रक्कम रु ११,५०,०००/-रु सफाईदार पणे चोरी करुन नेल्याची घटना दिनांक ०२/०२/२०२४ रोजी खडक पोलीस स्टेशन हददीमधील टिंबर मार्केट परिसरात घडली होती.
सदर बाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी महेश शिवाजी नाळे, वय ३४ वर्षे, धंदा व्यवसाय, रा. फ्लॅट नं सी ९, फेज २, निर्मल टाऊनशिप, काळेपडळ, हडपसर, पुणे हे दि.०२/०२/२०२४ रोजी दुपारी ०१.१५ वा ते ०१.४० वा. चे सुमारास मुकेश प्लाय, टिंबर मार्केट भवानी पेठ, पुणे येथे फिर्यादी यांच्यावर पाळत ठेवून, त्यांचे नकळत मुकेश प्लाय, टिंबर मार्केट भवानी पेठ, पुणे इमारतीचे पार्कंगमध्ये पार्क केलेले फिर्यादी यांचे गाडीचे डिकीतील रोख ११,५०,०००/- रु त्यांचे संमतीशिवाय मुद्दाम लबाडीचे इरादयाने चोरुन नेलेबाबत अज्ञात चोरटयाविरोधात खडक पोलीस स्टेशन गुन्हा रजि क्रमांक ४३/२०२४ भा.दं.सं. कलम ३७९ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. टिंबर मार्केट सारख्या व्यापारीक्षेत्रामध्ये भर दिवसा ११,५०,०००/-रु चोरी केल्याचा प्रकार घडल्याने त्याचा तपास करुन आरोपींचा शोध घेण्यासाठी श्री. रविंद्र गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरिक्षक, खडक पोलीस स्टेशन पुणे, श्री. संपतराव राउत, पोलीस निरिक्षक गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली तात्काळ तपास पथक अधिकारी सहायक पोलीस निरिक्षक श्री. राकेश जाधव व तपास पथकातील अंमलदार यांना तपासाबाबत सुचना दिल्या.
त्याप्रमाणे सहायक पोलीस निरिक्षक श्री. राकेश जाधव यांनी तपास पथकातील अंमलदार यांची दोन पथके तयार करुन तात्काळ तपास सुरु केला. तपास पथकातील पोलीस अंमलदार किरण ठवरे, संदीप तळेकर, प्रमोद भोसले, अक्षयकुमार वाबळे, सागर कुडले, प्रशांत बडदे यांची दोन पथके तयार केली.
प्रथमदर्शनी अज्ञात आरोपीने चोरी करण्यासाठी मोटारसायकलचा वापर केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने एका पथकाने चोरीची घटना घडल्यानंतरचा मार्ग व एका पथकाने चोरीच्या घटनास्थळी येण्याचा मार्ग असे दोन्ही मार्गाचे सी.सी.टि.व्ही फुटेज पाहण्यास सुरुवात केली.
सलग आठ दिवस दोन्ही मार्गाचे सी.सी.टि.व्ही. फुटेज तपासल्यानंतर सीसीटीव्ही फुटेजचे आधारे पाहीजे आरोपीचा माग घेत असताना सदर पाहीजे आरोपी हा बोपखेल फाटा येथे अंगात काळया रंगाचे जॅकेट व निळया रंगाचे जिन्स पॅन्ट परीधान करून थांबला असल्याबाबत खात्रीशीर माहीती मिळाली.
त्याअनुषंगाने बोपखेल फाटा याठिकाणी वरील वर्णनाचा इसम तेथे संशयित रित्या वावरताना मिळुन आला असता पथकाने त्यास तो पळुन जाणार नाही अशा रितीने सापळा रचुन त्यास ताब्यात घेतले व त्याचे नाव पत्ता विचारता त्याने आपले नाव रामकेवल राजकुमार सरोज, वय – ४६ वर्षे, सध्या रा-ज्ञानदा सोसायटी शिक्रापुर रोड चाकण पुणे, मुळ रा.१७२ पौथीपुर, कधईपुर, सुलतानपुर, लंभुआ, राज्य-उत्तरप्रदेश असे सांगितले. त्याचेकडे गुन्हयाबाबत अधिक विचारणा केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास ताब्यात घेवुन दाखल गुन्हयात दिनांक १०/०२/२०२४ रोजी २२.३५ वा अटक करण्यात आले.
अटक आरोपीकडे गुन्हयात चोरी केलेल्या ११,५०,०००/- रु रोख रकमेबाबत चौकशी केली असता अटक आरोपीने चोरी केलेल्या रोख रक्कम ही बँक ऑफ बडोदा, अहमदनगर शाखा, अॅक्सीस बँक, चाकण
शाखा या बँकेतील त्याचे स्वतःचे खात्यावर तसेच सेन्ट्रल बैंक ऑफ इंडिया, उत्तरप्रदेश शाखेत त्याचे पत्नीचे
खात्यावर जमा केल्याबाबत सांगितले. संबंधित बँकांना पत्रव्यवहार करुन वरील नमुद बँकेची खाती गोठविण्यात आली आहेत.
तसेच अटक आरोपीने चोरी करताना वापरलेल्या वाहनाबाबत तपास केला असता चोरी करताना
वापरलेले होंडा शाइन एम.एच.१२ एस. एन. ५८३० ही मोटारसायकल राजगड पोलीस स्टेशन गु.र.नं. २६ / २०२४ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे मधील चोरीस गेलेले वाहन असल्याचे तपासात निश्पन्न झालेले असुन सदरची मोटारसायकल ताब्यात घेतली आहे.
सदर गुन्हाचे तपासाकरीता नेमलेल्या पथकातील अंमलदार किरण ठवरे, संदीप तळेकर, प्रमोद भोसले,
अक्षयकुमार वाबळे, सागर कुडले, प्रशांत बडदे यांनी सहायक पोलीस निरिक्षक राकेश जाधव यांचे सुचनेनुसार
सलग आठ दिवस घटनास्थळापासुन ते दिघी, विश्रांतवाडी परिसरातील सरकारी/खाजगी असे जवळजवळ ५०० पेक्षा अधिक सी.सी.टि.व्ही. जिददीने व चिकाटीने तपासुन चोरटयाचा माग काढुन आरोपीला ताब्यात घेवुन
गुन्हा उघडकीस आणला आहे.
अटक आरोपी याने यापूर्वी अटक झाल्यानंतर त्याचे नाव रामकेवल राजकुमार सरोज, उर्फ राकेश प्रदीपसिंग रजपुत असे सांगितल्याची माहीती मिळाली असुन त्याचेवर पुणे शहर, पिंपरी चिंचवड, मुंबई आयुक्तालयात असे एकुण चोरीचे ३० गुन्हे दाखल असुन तो सराईत गुन्हेगार आहे. राकेश जाधव, सहायक पोलीस निरिक्षक, (तपास पथक अधिकारी) हे पुढिल तपास करीत आहेत.
नमुद सर्व कारवाई ही श्री. अमितेश कुमार पोलीस आयुक्त श्री. प्रविण पवार, सह पोलीस आयुक्त, श्री. प्रविण पाटील, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे, श्री. संदिपसिंह गिल, पोलीस उप आयुक्त परिमंडळ १ व श्रीमती रक्मीणी गलांडे, सहा पोलीस आयुक्त फरासखाना विभाग यांचे मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशन चे श्री. रविंद्र गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. संपतराव राउत, पोलीस निरीक्षक (गुन्हे), तपास पथक अधिकारी श्री. राकेश जाधव सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार संदिप तळेकर, किरण ठवरे, हर्षल दुडम, प्रमोद भोसले, अक्षयकुमार वाबळे, सागर कुडले, लखन ढावरे, प्रशांत बडदे, रफिक नदाफ, आशिष चव्हाण यांचे पथकाने केली आहे.