पुणे प्रतिनिधी : महापालिकाच्या पाणी पुरवठा विभागाच्या प्रमुखांना शिवीगाळ करणे कसब्याचे कॉँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांना भोवले असून यांच्यावर चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २६ जानेवारी रोजी घडली होती. सरकारी कामात अडथळा आणल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
याप्रकरणी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी फिर्याद दिली आहे. प्रजासत्ताक दिनी गोखलेनगर येथील आशानगरमध्ये पालिकेकडून पाण्याची टाकी बांधण्यात आलेली आहे. सामान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत ही टाकी बांधण्यात आली आहे. या पाण्याच्या टाकीचे उद्घाटन २६ जानेवारी रोजी करण्यात आले.
काँग्रेसचे माजी नगरसेवक दत्ता बहिरट यांनी या टाकीसाठी जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया केली होती. त्यांच्या प्रयत्नामधून ही टाकी बांधण्यात आली होती. दरम्यान, स्थानिक भाजपा आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दबाव टाकत या टाकीचे उद्घाटन भाजपाच्या नेत्यांच्या हातून करून घेतल्याचा आरोप करीत श्रेय लाटले जात असल्याची टीका आमदार धंगेकर यांनी केली होती. त्यान कार्यकर्त्यांसह टाकीच्या परिसरात जमा होत आंदोलन केले होते.
त्यावेळी महापालिका अधिकारी, पालिका अधिकारी आणि कॉँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली होती. यावेळी धंगेकरांनी पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांना शिवीगाळ केली होती. त्याचा व्हिडीओ समाजमाध्यमावर प्रसारित झाला होता. या घटनेचा पालिकेच्या हिरवळीवर महापालिका अधिकाऱ्यांनी सभा घेत निषेध व्यक्त केला होता. त्यानंतर जगताप यांनी मंगळवारी फिर्याद दिली. सोमवारी रात्री धंगेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.