झाडांच्या फांद्या तोडलेले चित्र :
पुणे : शहरातील चौका-चौकांत उभारलेल्या होर्डिंग्जमुळे नागरिकांचे जीव धोक्यात येत असतानाच आता याच होर्डिंग्जमुळे काही अधिकाऱ्यांच्या सहकार्याने बालगंधर्व चौकातील थेट झाडांच्या मुळावर उठल्याचा
धक्कादायक प्रकार न्युज प्रहारणे उघडकीस आनला आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून बेकायदा होर्डिंग्जवर कारवाई होणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याची सद्यःस्थिती आहे. बालगंधर्व चौकात नव्याने उभारण्यात आलेले श्री गणेश ॲडव्हर्टायझिंग कंपनीचे वीस बाय वीस चे दोन होल्डिंग जाहिरात फलक व्यवस्थित दिसत नसल्याने झाडाची विनापरवाना कत्तल करण्यात आली आहे.
झाडांच्या फांद्या तोडल्या आधीचे चित्र :
शहरातील मंगळवार पेठेत काही वर्षांपूर्वी होर्डिंग्ज कोसळून झालेल्या अपघातात दोन नागरिकांचा जीव गेला होता, तर मागील एक ते दीड वर्षापूर्वीच रावेत परिसरातही होर्डिंग्ज कोसळल्याने पाच नागरिकांचे जीव गेले होते. त्या घटनेनंतर महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाकडून बेकायदा होर्डिंग्जवर कारवाई करण्यात आली. मात्र पुन्हा शहरासह उपनगरांत तसेच महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांच्या हद्दीतही बेकायदा होर्डिंग्ज वाढत असल्याची सद्यःस्थिती आहे. महापालिकेची जाहिरातफलक नियंत्रण नियमावली धाब्यावर बसवून बेकायदा होर्डिंग्ज वाढत आहेत. दरम्यान, शहराच्या काही भागांत होर्डिंग्जसाठी झाडांची कत्तल केली जात असल्याचा धक्कादायक प्रकारही पुढे आला आहे.
वानवडी, हडपसर, महंमदवाडी यासह काही भागांत बेकायदेशीरपणे झाडे कापण्याचे प्रकार घडले आहेत. वानवडीमधील जगताप चौक, संविधान चौक या ठिकाणी तर होर्डिंग्ज ठळकपणे दिसण्यासाठी झाडांच्या मोठमोठ्या फांद्या कापल्या आहेत. एका होर्डिंगसाठी तर संपूर्ण झाड तोडले आहे.
कारवाई होणार कधी?
शहराच्या मध्यवर्ती भागातीलच ठराविक होर्डिंग्जवर महापालिकेकडून कारवाई होते. मात्र उपनगर व नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये अक्षरशः सुळसुळाट झाला आहे. यात मोठे आर्थिक गणित असल्याने तसेच अनेकांचे हितसंबंध गुंतलेले असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नाही. नागरिकांचे जीव गेल्यावरच महापालिका बेकायदा होर्डिंग्जवर कारवाई करणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. वानवडीतीलच जगताप चौक, संविधान चौकात दोन होर्डिंग्जमध्ये १० फूट अंतर ठेवण्याच्या नियमाचेही उल्लंघन करण्यात आले आहे.