NEWS PRAHAR ( पुणे ) दि : २४ फेब्रुवारी : पुणे शहरातील मार्केट यार्ड परिसर व इतर भागांमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर धंद्यांवर कारवाई व्हावी, या मागणीसाठी संविधानिक व शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय दलित युथ मुव्हमेंटने घेतला होता. यासाठी संबंधित कार्यालयात विधिवत अर्ज देखील सादर करण्यात आला होता.
मात्र अर्जाची सखोल शहानिशा न करता बंडगार्डन पोलीस स्टेशनकडून दलित युथ मुव्हमेंटचे संस्थापक अध्यक्ष श्री. अविनाश शेलार यांना BNS कलम 168 अंतर्गत नोटीस बजावण्यात आली आहे.ही कारवाई सामाजिक कार्यकर्त्यांना घाबरवण्याचा व लोकशाही मार्गाने आवाज उठवणाऱ्यांना दबावाखाली आणण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
भारतीय राज्यघटनेच्या कलम 19(1)(a) व 19(1)(b) नुसार नागरिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य व शांततापूर्ण आंदोलनाचा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे अशी नोटीस देणे म्हणजे लोकशाही अधिकारांवर गदा आणण्याचा प्रकार आहे.पुणे पोलिस प्रशासनाने सामाजिक कार्यकर्त्यांना नोटीस देण्याऐवजी शहरातील बेकायदेशीर धंदे, जुगार, मटका, अवैध व्यवसाय यांच्यावर तात्काळ कारवाई करावी. अन्यथा पोलिस प्रशासन बेकायदेशीर धंदेवाल्यांना संरक्षण देत असल्याचा संशय अधिक बळावेल.
आमच्या ठाम मागण्या :
1) सदर नोटीस तात्काळ मागे घ्यावी.
2) आंदोलनास कायदेशीर परवानगी द्यावी.
3) मार्केट यार्ड परिसरातील अवैध धंद्यांवर विशेष मोहीम राबवावी.
4) संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करावी.
अन्यथा दलित युथ मुव्हमेंटकडून पुणे पोलिस आयुक्त कार्यालयासमोर तीव्र लोकशाही आंदोलन करण्यात येईल व याबाबत महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग, अनुसूचित जाती आयोग तसेच गृह विभाग यांच्याकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात येईल.
लोकशाही हक्कांसाठी लढा सुरूच राहील !
~ अविनाश शेलार
संस्थापक अध्यक्ष, दलित युथ मुव्हमेंट
पुणे…