सूत्रांच्या माहितीनुसार हुक्का पार्लर मध्ये पोलिस भागीदार असल्याची चर्चा..
NEWS PRAHAR ( पुणे ) : विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत कायदा-सुव्यवस्था कोलमडून पडली असून, परिसर हा हुक्का पार्लर, मटका, विना परवाना दारू विक्री, मसाज पार्लर, गोवा गुटखा आणि गांजा यांसारख्या समाजविनाशक धंद्यांचा अड्डा बनला आहे. दिवसा ढवळ्या खुलेआम दारू विक्री, पहाटेपर्यंत चालणारे हुक्का पार्लर, ड्राय डे ला ब्लॅकने विकली जाणारी दारू यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. तरुणाईचे भवितव्य धोक्यात आले असताना पोलीस मात्र गप्पगप्प असल्याने संतप्त नागरिक प्रशासनाला सरळ प्रश्न विचारत आहेत – या विकृतीस जबाबदार कोण?
हुक्का पार्लरची विकृती आणि तरुणाईचा नाश :
विमानतळ परिसरातील साकोरे नगर व इतर भागात हुक्का बंदी असतानाही पार्लरमध्ये धुडगूस सुरू आहे. धुरकट वातावरणात तरुण पिढी नशेच्या गर्तेत खेचली जात असून, याचा थेट परिणाम समाज आणि कुटुंब व्यवस्थेवर होत आहे.
ड्राय डे ला पण दारू उपलब्ध :
शासनाच्या नियमांची धज्ज्या उडवत ड्राय डे ला देखील ब्लॅक मार्केटमध्ये दारू मिळते. उशिरा रात्रीपर्यंत दारूची विक्री सुरू असते. गांजा, गुटखा व इतर अंमली पदार्थांच्या साखळ्या येथे जोरात सुरू आहेत. अनेक युवक याच्या आहारी गेले असून, गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी मिळत आहे.
पोलिसांची डोळेझाक, नागरिक संतप्त :
या सर्व अवैध धंद्यांवर पोलिसांचे आश्रय असल्याशिवाय इतका मोठा धुमाकूळ होणे शक्य नाही, अशीच नागरिकांमध्ये चर्चा रंगत आहे. कायदा-सुव्यवस्था राखणारे पोलीसच जर अशा धंद्यांना अभय देत असतील तर सामान्य माणूस न्यायासाठी कुठे जाईल, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
जवाबदार कोण?
“विमानतळ परिसरात चालणाऱ्या या समाजविघातक कृत्यांस जबाबदार कोण?” हा प्रश्न आता टोकदार स्वरूपात विचारला जात असून, प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष न दिल्यास नागरिक आंदोलनाचा इशारा देत आहेत.