NEWS PRAHAR ( छत्रपती संभाजीनगर ) : ‘‘सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या तर विधानसभा निवडणुकीतून मी माघार घेईन आणि माझी जागा महायुतीला देईल,’’ अशी घोषणा प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. आम्ही स्वबळाऐवजी शेतकऱ्यांना सोबत घेऊन लढणार. आमच्या मागण्या व मुद्दे मान्य केले तर माझीही जागा युतीला देऊन त्यांच्या पायी प्रचार करेल, असेही ते म्हणाले.
‘क्रांतिदिनी (ता. ९ ऑगस्ट) छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकरी, अपंग, निराधार जनतेसाठी मोठ्या मोर्चाचे आयोजन केले आहे. यावेळी आमच्या मागण्यांचे निवेदन सरकारला देण्यात येईल. आर्थिक विषमता निर्माण करण्याचा प्रकार सुरू आहे. ज्यांना हात-पाय आहेत, त्यांना महिन्याला पैसे देणार अन् दिव्यांगांना का नाही? ही तफावत दूर करण्यासाठी हा मोर्चा असेल. संभाजीनगर मोर्चामध्ये दीड लाख लोक सहभागी होणार आहेत. हा मोर्चा जाती धर्मासाठी नाही. माझा रोख कुठल्या योजनेकडेही नाही; पण व्याधी पाहून मदत करा. त्यांचे कष्ट मोजा इतकेच आमचे म्हणणे आहे,’’असे कडू यांनी सांगितले.
मुंबईतील जागा ताब्यात घ्या….
ज्या पारशी लोकांनी इंग्रजांच्या सांगण्यावरून भारतीयांना त्रास दिला होता, त्या पारशांना इंग्रजांनी मुंबईत सहा हजार एकर जमीन दिली होती. सरकारने ही जमीन ताब्यात घ्यावी. आम्ही सरकारला याचे उत्तर मागणार आहोत. सरकारने ऐकले तर ठीक; अन्यथा आम्ही जमिनी ताब्यात घेऊ. इंग्रजांशी हातमिळवणी करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. त्यासंदर्भातील सर्व पुरावे आमच्याकडे आहेत. निवडणुकीसाठी मी करतोय, असे म्हणत असाल तर ‘होय’ करतोय. हे मुद्दे निवडणुकीत आलेच पाहिजे, अशी भूमिका कडू यांनी मांडली.