Newsprahar

बारामती नगरपरिषदेच्या नगररचनाकाराला एक लाखाची लाच प्रकरणी अटक ; एक लाखाची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले !

NEWS PRAHAR  { पुणे } : बारामती नगरपरिषदेचे नगररचनाकार विकास किशोर ढेकळे यांना लाच मागणी प्रकरणात एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. बुधवारी (दि. १९) रात्री आठच्या सुमारास शहरातील एका जिममधून ढेकळे यांना एसीबीने ताब्यात घेत अटक केली. जीममध्ये ACB ने केलेल्या या कारवाईची मोठी चर्चा शहरात झाली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

बारामती नगरपरिषदेचा नगररचना विभाग सातत्याने विविध कारणांनी चर्चेत असतो. ढेकळे हे गेल्या दोन महिन्यांपूर्वीच पुण्याहून बारामती नगरपरिषदेत बदलून आले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी नुकतीच दहा दिवसांची दुबई टूर केल्याची माहिती समोर येत आहे.

बारामतीतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाला सहीसाठी पावणेदोन लाख रुपयांची मागणी करणाऱ्या बारामती नगरपरिषदेच्या नगररचना अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज रंगेहाथ पकडले. आज सायंकाळी हा अधिकारी जिममध्ये १ लाख रुपये स्वीकारत असताना ही कारवाई करण्यात आली.

बारामतीतील एका प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिकाची एक फाईल बारामती नगर परिषदेच्या नगर रचना विभागात प्रलंबित होती. या फाईलवर सही करण्यासाठी नगर रचना विभागाचा अधिकारी विकास ढेकळे यानं पावणेदोन लाख रुपयांची लाच मागितली होती,

तडजोडी अंती या अधिकाऱ्याने एक लाख रुपये घेऊन ही सही करण्याची तयारी दर्शवली होती. त्यानुसार आज सायंकाळी सापळा रचत विकास ढेकळे याला बारामती शहरातील एका जिममध्ये एक लाख रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले. या अधिकाऱ्यावर यापूर्वीही लाच प्रकरणी कारवाई झाल्याची माहिती पुढे येत आहे. आज सायंकाळी झालेल्या कारवाईनंतर बारामती नगर परिषदेसह प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

गेले काही दिवसात विकास ढेकळे याच्या पैशांच्या हव्यासाचे अनेक किस्से चर्चेत होते. कोणतही काम करायचं झाल्यास हा अधिकारी पैशाशिवाय करत नव्हता. त्यामुळे बारामतीतील व्यावसायिकांसह सामान्य नागरिकही वैतागले होते. आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईनंतर या अधिकाऱ्याच्या जाचातून सर्वसामान्यांसह बांधकाम व्यावसायिकांची मुक्तता झाली अशी प्रतिक्रिया आता व्यक्त होत आहे.