Newsprahar

पुण्यामध्ये एक संपूर्ण ट्रकच खड्ड्यामध्ये पडल्याची विचित्र घटना…

पुणे  : पुण्यामध्ये एक संपूर्ण ट्रकच खड्ड्यामध्ये पडल्याची विचित्र घटना घडली आहे. पुण्यातील समाधान चौक परिसरातील सिटी पोस्ट आवारामध्ये पेव्हिंग ब्लॉकचा रस्ता अचानक खचला. त्यामुळे पडलेल्या खड्ड्यामुळे संपूर्ण ट्रकच त्या खड्ड्यामध्ये कोसळल्याची भयंकर घटना घडली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार हा ट्रक पुणे महापालिकेचा आहे. ड्रायव्हरने प्रसंगावधान राखून उडी मारल्याने त्याचा जीव वाचला. ट्रकसोबत आणखी दोन दुचाकी सुद्धा खड्ड्यात पडल्याचं बोललं जातंय. 

हा रस्ता  पेव्हिंग ब्लॉकने  तयार केलेला असताना सुद्धा भलामोठा खड्डा पडून संपूर्ण ट्रकच खड्ड्यात पडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान अग्निशमन दलाला या संदर्भात माहिती कळवण्यात आली. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.

एका बाजूला शहरातील अपघातांचं सत्र थांबण्याचं नाव घेईना, थोड्याश्या पावसात रस्ते तुंबत आहेत. आता तर थेट रस्ताच खचून भलामोठा खड्डा पडल्याने नागरी सुविधांचा अक्षरशः बोजवारा उडाला असल्याचं नगरिक बोलत आहे.