Newsprahar

पुणे शहरातील पब, बार, रुफ टॅाप हॉटेल, क्लब आणि हुक्का पार्लर संदर्भात पुणे पोलीसांचा मोठ्ठा निर्णय मनमानी कारभाराला पोलिसांनी लावला चाप…

बाऊन्सर्स’वर करडी नजर…

हुक्का’ आढळून आल्यास गुन्हा…

नियमांच्या कडक अमलबजावणी करिता कलम १४४ चे निकष लागू….

शैक्षणिक संस्थांच्या १०० मीटरच्या  परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास बंदी…

पुणे : शहरातील ‘पब-बार-रेस्टॉरंट-रूफ टॉप’च्या मनमानी कारभाराला पोलिसांनी चाप लावला असून नियमांच्या कडक अमलबजावणी करिता कलम १४४ चे निकष लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कलम १४४ अंतर्गत मार्गदर्शक सूचना लागू करण्यात आल्या असून नियमभंग केल्यास कडक कारवाई सामोरे जावे लागेल असा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला.

पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘पब-बार-रेस्टॉरंट-रूफ टॉप’ हॉटेल्स यांनी त्यांना ठरवून दिलेल्या वेळेतच आस्थापना सुरू ठेवल्या पाहिजेत. त्यांनी वेळेची मर्यादा ओलांडू नये. रात्री दीड नंतर कोणतेही हॉटेल अथवा ‘पब-बार-रेस्टॉरंट-रूफ टॉप’ सुरू राहणार नाही याची दक्षता घेतली जावी. ‘आऊटसाईड’ स्पीकरला रात्री दहा वाजेपर्यंतच परवानगी असून त्यांचे उल्लंघन केले जाऊ नये. रूफ टॉप हॉटेलमध्ये मद्य विक्रीची परवानगी नसताना देखील मद्य विक्री केली जात असेल तर कारवाई केली जाणार आहे. याठिकाणी विना परवाना मद्यविक्री होणार नाही याची दक्षता घेतली जावई. यासोबतच ज्या वयोगटामधील नागरिकांना मद्य पिण्यास परवानगी आहे त्यांनाच मद्य विक्री केली जावी.

जर एखाद्या मनोरंजनात्मक कार्यक्रमासाठी डीजे, कलाकार, विदेशी कलाकार येणार असतील तर त्याची १५ दिवस आधी सविस्तर माहिती पोलिसांना कळविणे बंधनकारक करण्यात आले आहे. तिकीट लावून होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती पोलिसांना मिळणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक ‘पब-बार-रेस्टॉरंट-रूफ टॉप’ हॉटेलमध्ये सीसीटीव्ही लावणे बंधनकारक आहे. या सीसीटीव्हीसाठी दोन डीव्हीआर ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासोबतच आतमध्ये ‘स्मोकिंग’साठी स्वतंत्र जागा ठेवणे आवश्यक असल्याचे आयुक्त अमितेश कुमार म्हणाले. हे आदेश १५ दिवसांकरिता लागू करण्यात येणार आहे. त्यावर नागरिकांच्या हरकती व सूचना मागवण्यात आल्या आहेत. त्याचा अभ्यास करून पुढील निर्णय घेतला जानार आहे.

पब-बार-रेस्टॉरंट-रूफ टॉप’ हॉटेल्सला सुरक्षा रक्षक नेमणे बंधनकारक आहे. जर याठिकाणी बाऊन्सर्स ठेवले जात असतील तर त्यांचे गुन्हेगारी रेकॉर्ड तपासले जाणे आवश्यक आहे. मागील दहा वर्षात जरा गुन्हे दाखल असतील तर त्यांना सुरक्षारक्षक म्हणून नेमता येणार नाही. अपवादात्मक परिस्थितीमध्ये जर नेमायचे असतील तर त्याकरिता स्थानिक परिमंडलीय उपायुक्ताची लेखी परवानगी आवश्यक करण्यात आली आहे. सुरक्षारक्षकांनी नागरिकांची सुरक्षा आणि वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे.

कोणत्याही प्रकारच्या ‘पब-बार-रेस्टॉरंट-रूफ टॉप’ हॉटेलमध्ये सर्व प्रकारचा हुक्का, शिशा आदी प्रकारांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. जर हुक्का आणि शिशाच्या नावाखाली नक्षेची दुकाने चालवली जात असतील तर कडक कारवाई केली जाणार आहे. संबंधितांवर गुन्हा दाखल करून कारवाई केली जाणार आहे.

शाळा महाविद्यालये, शैक्षणिक संस्थांच्या १०० मीटरच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास बंदी घालण्यात आली आहे. जर याठिकाणी या पदार्थांची विक्री केली जात असल्याचे आढळून आले तर कारवाई होणार आहे. यासोबतच शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांच्या परिसरात घुटमळणाऱ्या आणि विद्यार्थिनींना त्रास देणाऱ्या रोडरोमियो, तरुण आणि टोळक्यांना पोलिसांकडून ‘प्रसाद’ दिला जाणार आहे.