Newsprahar

पुणे परिसरात तीन विविध अपघातांत तिघांचा मृत्यू….

NEWS PRAHAR ( पुणे ) : शहरात वेगवेगळ्या अपघातांत वाहनांच्या धडकेत तीन तरुणांचा मृत्यू झाला. या अपघातांत दोघे गंभीर जखमी झाले आहेत. कोथरूड, सिंहगड रस्ता, हडपसर भागांत अपघाताच्या घटना घडल्या.

हडपसर-मुंढवा रस्त्यावर मांजरी परिसरात शुक्रवारी (ता. १) रात्री भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला, तर सहप्रवासी तरुण जखमी झाला. कुणाल संतोष घाडगे (वय २१, रा. गोपाळपट्टी, मांजरी बुद्रुक, हडपसर) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. अपघातात महेश बबन घाडगे हा गंभीर जखमी झाला.

कोथरूड भागात भुसारी कॉलनीकडे जाणाऱ्या सेवारस्त्यावर शुक्रवारी दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला असून, सहप्रवासी आकाश अजित भेके (वय २३, रा. जुन्नर) याचा मृत्यू झाला. दुचाकीस्वार ऋतिक आणि त्याचा मित्र आकाश हे बाह्यवळण मार्गावरून कोथरूडमधील भुसारी कॉलनीकडे निघाले होते.

वडगाव बुद्रुक परिसरात विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसच्या धडकेत दुचाकीस्वार महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाला. स्वप्नील संपत पवार (वय २३, रा. कडेगाव, जि. सांगली) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी बसचालक धनाजी शंकर चव्हाण (वय ४१, रा. ओंकार हाईट्स, नऱ्हे) याला अटक करण्यात आली.