Newsprahar

पिंपरीतील कुदळे कॉलनीत भूमिगत केबल्सच्या कामाचे आमदार आण्णा बनसोडेंच्या हस्ते भूमिपूजन…

सामाजिक कार्यकर्ते सुहास कुदळे यांच्या प्रयत्नातून संपणार १५ वर्षांचा वनवास…

न्यूज प्रहार ( पिंपरी ) : मागील १५ वर्षांपासून पिंपरी गावातील कुदळे कॉलनी १,२,३,४ आणि कुदळे पडाळ १,२ व ३ या ठिकाणच्या नागरिकांना सतावणारा खंडित विजपुरवठ्याचा गहन प्रश्न अखेर मार्गी लागला असून आमदार आण्णा बनसोडे यांच्या निधीतून या भागात भूमिगत केबल्स टाकण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. त्यामुळे या कॉलन्यांमध्ये राहणाऱ्या शेकडो कुंटुंबाचा व हजारो नागरिकांचा वनवास १५ वर्षांनंतर संपला आहे.

सामाजिक कार्यकर्ते सुहास कुदळे यांनी यासाठी मागील अनेक वर्षांपासून सातत्यपूर्ण प्रयत्न केले होते. त्यांच्या या प्रयत्नांना बोपखेल येथील युवा नेतृत्व शशिकांत घुले यांच्या सहकार्यातून यश मिळाले आहे. आमदार आण्णा बनसोडे यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी महापौर संजोग वाघेरे, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्यासह पिंपरीतील अनेक राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व कुदळे कॉलनी तसेच कुदळे पडाळमधील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना सुहास कुदळे म्हणाले की, मागील १० ते १५ वर्षांपासून गावातील कुदळे कॉलनी व कुदळे पडाळ हा संपूर्ण भाग अनियमित वीज पुरवठ्याच्या समस्येने त्रस्त होता. यासंदर्भात मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी लोकप्रतिनिधी असतील वा महावितरण विभागाचे अधिकारी असतील यांच्याकडे सातत्याने अर्ज,निवेदने देऊन हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली.

अखेर आमच्या या प्रयत्नांना यश मिळाले आहे. आमचे मार्गदर्शक शशीकांत घुले यांच्या सहकार्यातून आणि आमदार आण्णा बनसोडे यांच्या निधीतून याठिकाणी कामाचे भूमिपूजन करण्यात आल्याने या भागातील हजारो नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, अशा शब्दांत सर्व नागरिकांच्या वतीने सुहास कुदळे यांनी आमदार आण्णा बनसोडे यांचे आभार व्यक्त केले.