NEWS PRAHAR ( सुपे ) : या वेळी आम्ही ठरवलंय महाराष्ट्राचे सरकार काही झाले तरी हातात घ्यायचे आहे. त्यानंतर पाणी, कांदा व दुधाच्या दराचा प्रश्न कसा सुटत नाही ते बघू. आता तुम्ही विधानसभेसाठी काम करा. बाकी कामाचे ओझे माझ्या खांद्यावर टाका, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुपे (ता.बारामती) येथे दिली. आगामी निवडणूकीत राज्याचे सरकार आमचेच असेल असा निर्धार त्यांनी या वेळी बोलताना व्यक्त केला.
तालुक्यातील शिर्सुफळ, उंडवडीसुपे व सुपे येथे पवार यांचा जनसंवाद दौरा होता. यानिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी तरूण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्यावतीने पवार यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पक्षाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, विकास लवांडे, तालुकाध्यक्ष अॅड.एस.एन.जगताप, ज्येष्ठ कार्यकर्ते सतीश खोमणे, सदाशिव सातव, युगेंद्र पवार, वनिता बनकर, हनुमंत चांदगुडे, सचिन लडकत, महादेव भोंडवे आदींसह आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, काऱ्हाटीच्या माजी सरपंच प्रिती जगताप, ईश्वर लोणकर यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला. शेवाळे यांनी त्यांचा सत्कार केला. तर नीट परीक्षेत चांगले गुण मिळवल्याबद्दल जिनत शेख हीचा सत्कार करण्यात आला.
निवडणूकीत कोणते बटण दाबायचे हे कतृत्व तुम्ही दाखवले. तुम्ही तुमचे काम केले. आता तुम्ही विधानसभेचे काम करा. बाकी कामाचे ओझे माझ्या खांद्यावर टाका, असे सांगून पवार म्हणाले – आज खासदार सुप्रिया सुळे येणार होत्या, पण कौटुंबिक महत्वाच्या कामामुळे बाहेरगावी गेल्यामुळे येऊ शकल्या नाहीत. त्या यथावकाश आपल्या भागाला भेट देतील व तुमच्या कामात लक्ष घालतील याबाबत माझ्या मनात शंका नाही.
पवार म्हणाले – जनाई योजना मंजूर करण्याचा अधिकार माझ्याकडे होता. काही ठिकाणी जमिनीच्या अडचणी आल्या तर काही भागात कालवे झाले नाही. योजनेचा फायदा काही भागाला झाला तर काही भाग वंचित आहे. चाऱ्यांची कामे अपुरी आहेत. आवर्तन वेळेवर मिळत नाही. ही अर्धवट कामे झाली. त्याची पूर्तता करून घ्यावी लागणार आहे. आता सुप्याकडे येताना कारखेल, देऊळगावरसाळ या गावाहून आलो. आज माझ्याकडे निवेदने आली तीत पाण्याची निवेदने अधिक आहेत. जनाई-शिरसाई योजनेद्वारे तलाव भरावेत. पाईपलाईन करावी तर काहींच्या मते करू नये अशा मागण्या आल्या आहेत.
दुधाचा धंदा वाढला आहे. सुपे व परिसरातून दुधाचे दररोजचे संकलन सुमारे ३० हजार लिटर आहे. दुधावर प्रक्रिया करणारे तीन कारखाने आहेत. दुधाचा जोडधंदा प्रपंच चालवण्याकरिता उपयुक्त असल्याने प्रतिलीटर पाच रूपये दर वाढवून देण्याची मागणी सरकारकडे केली होती. निर्णय घेतला पण पैसे मिळाले नाहीत. यापुढे दुधाची रक्कम वाढवून घेण्याची मागणी करावी लागेल. कर्नाटक, गुजरातच्या कांद्यावर कर नाही. केंद्र सरकारने महाराष्ट्रातील कांद्यावर ४० रूपये निर्यात कर बसवला. परिणामी कांद्याची खरेदी थांबली.
जनाई योजनेत काऱ्हाटी, बाबुर्डी, शेरेचीवाडी या गावांचा समावेश करावा. आवर्तनाचा कालावधी ठरवून द्यावा. विधान सभेला शरद पवार हेच उमेदवार समजून काम करू. असे मत पोपटराव पानसरे यांनी प्रास्तावीकात व्यक्त केले. सुत्रसंचालन दिपक वाबळे यांनी केले. आभार समाधान देशमुख यांनी मानले.