NEWS PRAHAR ( पुणे ) : धनकवडीतील श्री सद्गुरू शंकर महाराज समाधी ट्रस्टच्या माजी विश्वस्तांवर २०१६ मध्ये दाखल केलेला गुन्हा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या (मनपा) न्यायालयाने फेटाळून लावला.पुणे महापालिकेने ३० जानेवारी २०१६ रोजी ट्रस्टच्या मालकीच्या इमारतीस दुरुस्तीची परवानगी दिली होती, मात्र दुरुस्तीदरम्यान बांधकाम कोसळल्याने त्याच जागेवर व त्याच मोजमापात नव्याने बांधकाम करण्यात आले.
त्यावर त्रयस्थ व्यक्तींनी हरकत घेत धर्मादाय आयुक्तांकडे अर्ज दाखल केला होता. तो अर्ज धर्मादाय आयुक्त कार्यालयाने फेटाळला होता. त्यानंतर ट्रस्टने अधिकृत वास्तुविशारदामार्फत महापालिकेकडे बांधकाम नियमितीकरणाचा प्रस्ताव सादर केला. त्यास महापालिकेने जानेवारी २०१७ रोजी मंजुरी दिली. त्यावेळी महापालिकेने सहकारनगर पोलिसांना यासंदर्भातील तक्रार मागे घेत असल्याचे लेखी स्वरूपात कळवले होते.
त्यानुसार युक्तिवाद ग्राह्य धरत नियमबाह्य बांधकामाचे नियमितीकरण अधिकृत प्राधिकरणाकडून झाल्याने गुन्हा उरत नाही. याशिवाय महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना कायद्यानुसार खटला दाखल करण्यासाठी आवश्यक असलेली वैधानिक मंजुरी उपलब्ध नसल्याचेही निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. याप्रकरणी अॅड. सिद्धांत मालेगावकर, अॅड. चेतन राक्षे व अॅड. प्रशिक राक्षे यांनी युक्तिवाद केला.