Newsprahar

टोळक्याकडून नऊ वाहनांची तोडफोड;: हडपसर परिसरातील घटना…

NEWS PRAHAR  ( पुणे ) : हरात किरकोळ वादातून गुंड टोळक्यांकडून वाहनांची तोडफोड करण्याचे प्रकार सुरूच आहेत. हडपसरमधील काळेपडळ भागात पूर्ववैमनस्यातून एका टोळक्याने मोटारी आणि रिक्षांसह नऊ वाहनांची तोडफोड केली. या प्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी अभिषेक उद्धव झगडे (वय २४, रा. स्वराज पार्क, काळेपडळ, हडपसर) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून साहिल कांबळे (रा. काळेपडळ, हडपसर) याच्यासह पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहिल आणि अभिषेक यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद झाला होता.

त्यानंतर अभिषेकने रागाने बघितल्याच्या कारणावरून साहिल आणि त्याचे साथीदार सोमवारी दुपारी काळेपडळ भागात आले. त्यांनी लाकडी दांडक्यांनी आणि दगडांनी दोन मोटारी आणि दोन टेम्पोसह पाच रिक्षांच्या काचा फोडून परिसरात दहशत पसरवली. याबाबत माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पतंगे, पोलिस उपनिरीक्षक संजय आदलिंग, अविनाश शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी साहिल कांबळेला रात्री अटक केली असून, त्याच्या इतर साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे.