पुणे – कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोरेगाव पार्क व परिसरात सर्रास अवैध हुक्का पार्लर सुरू आहेत.होली कॅफे व द डार्क हॅार्स येथे रात्रंदिवस हुक्का पार्लर चालू आहेत. यामुळे या परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. मात्र भितीमुळे कोणीही नागरिक समोर यायला तयार नाही. अनेक ठिकाणी हुक्का पार्लर व अंमली पदार्थांची विक्री होताना दिसत आहे.
अनधिकृत हुक्का पार्लर हे सर्रास सुरू असून प्रशासनाचे याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. कॅफे व हॅाटेल या अनेक ठिकाणी अवैध व्यवसाय सुरु आहेत. अनेक बाहेरील टपऱ्यांवर बंदी असलेला गुटखा आणि इतर हुक्का व अंमली पदार्थ मिळत असल्याचे समोर आले आहे. अनेक टपऱ्यांवर हुक्याचे साहित्य सुद्धा मिळत आहे.
मागील काही दिवसांपासून अल्पवयीन मुलांना पब, हॅाटेल व हुक्का कॅफेमध्ये मध्ये सहज प्रवेश उपलब्ध होत असल्याने, हुक्का व गांजा ओढण्याचे प्रमाण वाढले आहे. टोळक्याने गांजा व हुक्का ओढण्यात येतो, असे नागरिक नाव न घेण्याच्या अटीवर सांगतात.
अवैध धंद्यांमुळे गुन्हेगारीत वाढ ..
वाढलेल्या अवैध हुक्का पार्लर व गांजा धंद्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. यामध्ये अल्पवयीन मुले तसेच सराईत गुन्हेगारांचा समावेश दिसून येतो. बंदी असताना मिळणारा सर्रास गुटखा सोबतच मिळणारे नशांचे विविध पदार्थ हे अल्पवयीन मुलांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढण्यास कारणीभूत ठरत आहेत. कोरेगाव पार्क येथे हे हुक्का व अंमली पदार्थ कॅफे, हॅाटेलमध्ये सहज मिळतात.
नागरिकांच्या प्रतिक्रिया..
कोरेगाव पार्क परिसरामध्ये राजरोसपणे नशेची साधने सहज उपलब्ध होत असल्याने तरुण पिढी पूर्णपणे नशेच्या विळख्यात अडकली आहे. सिगारेट, दारू, मेडिकलमध्ये मिळणाऱ्या काही विशिष्ट प्रकारच्या गोळ्या, इंजेक्शन आणि मोठ्या प्रमाणात गांजाविक्री होत आहे . तसेच कोरेगाव पार्क येथे अंमली पदार्थाची विक्री होत आहे.
आयुक्त साहेबांच्या आदेशानंतर अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणावर पुण्यात अटकाव आणण्यात आला असुन कोरेगाव पार्क या ठिकाणी तेरी भी चूप मेरी भी चूप अश्या पध्दतीने होली कॅफे व द डार्क हॅार्स येथे पहाटे ६ पर्यंत सर्व काही सुरूळीत चालू आहे. यावर कोणाचे लक्ष का नाही? असे स्थानिक नागरीकांमध्ये चर्चा आहे. पोलीस या अवैद्य पद्धतीने चालणाऱ्या हुक्का पार्लर वर लक्ष देतील का?