Newsprahar

आयुर्वेदिक मसाजच्या नावाखाली सुरु होता वेश्या व्यवसाय ;गुन्हे शाखेकडून पर्दाफाश…

NEWS PRAHAR ( पुणे ) : सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यातील परिसरात एका आयुर्वेदिक मसाज  उपचार केंद्रामध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एका महिलेवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. तर तीन महिलांची सुटका केली आहे. ही कारवाई माणिक बाग येथील जैन मंदिरा शेजारी असलेल्या मोरया आयुर्वेदिक मसाज उपचार केंद्र येथे शुक्रवारी (दि.14) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

या प्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात एका महिलेविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. याबाबत सामाजिक सुरक्षा विभागाच्या महिला पोलीस हवालदार रेश्मा गणपत कंक यांनी फिर्याद दिली आहे.

सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यातील परिसरात जैन मंदिरा शेजारी असलेल्या आदर्श अपार्टमेंट मधील फ्लॅट नंबर दोनमध्ये असलेल्या मोरया आयुर्वेदिक मसाज उपचार केंद्र येथे वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला समजली. त्यानुसार पथकाने बनावट ग्राहक पाठवून खात्री करुन घेतली.

त्यानंतर मसाज उपचार केंद्र येथे छापा टाकला. आरोपी या ठिकाणी आयुर्वेदिक मसाजच्या नावाखाली पीडित महिलांकडून वेश्या व्यवसाय करुन घेत होती. वेश्या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशातून आरोपी स्वत:ची उपजिवीका भागवत असल्याचे तपासात समोर आले. पोलिसांनी तीन पिडीत महिलांची सुटका केली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार करीत आहेत.