NEWS PRAHAR ( पुणे ) : पुण्यात पोर्शे ही आलिशान कार भरधाव वेगात चालवून दोन तरुणांचा जीव घेतल्याच्या घटनेतील अल्पवयीन आरोपी बिल्डरपुत्राची बाल न्याय मंडळानं १३ दिवसांनी रिमांड वाढवली आहे. त्यानुसार, त्याला २५ जूनपर्यंत निरिक्षणगृहात ठेवण्यात येणार आहे. पुणे पोलिसांनी यासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाल्यानंतर मंडळाच्या अध्यक्षा अक्षी जैन यांनी हा आदेश दिला.
पबमध्ये मद्यपान करून सुसाट महागडी मोटार चालवत दोघांच्या मृत्यूस जबाबदार ठरलेल्या अल्पवयीन मुलाला १२ जूनपर्यंत निरिक्षणगृहात पाठविण्याचा आदेश मंडळाने दिला आहे. ही मुदत संपत असल्याने पोलिसांनी मुलाला आणखी काही दिवस निरिक्षणगृहात ठेवण्यासाठीच्या हालचाली सुरू केल्या होत्या. त्यानुसार मुलाला आणखी १४ दिवस निरिक्षणगृहात ठेवण्यात यावे, असा अर्ज बुधवारी (ता. १२) दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे तपास अधिकारी असलेले सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांनी हा अर्ज केला आहे.
दरम्यान सुरुवातील मुलाला पाच जूनपर्यंत निरिक्षणगृहात ठेवण्याचा आदेश मंडळाने दिला होता. नंतर त्यात सात दिवसांची वाढ करण्यात आली होती. त्यामुळे अल्पवयीन मुलाचा निरिक्षणगृहातील मुक्काम १२ जूनपर्यंत वाढला होता. आता पुन्हा या मुदतीत २५ जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांना दोनदा मुदतवाढ मिळाली आहे. अद्याप मुलाचे समुपदेशन सुरू आहे. तसेच व्यसनाधिनतेबाबत देखील त्याला समुपदेशन करण्यात येत आहे. सुधारगृहातून सुटका झाल्यास त्याच्या जीविताला धोका आहे, अशी माहिती मंडळातील सरकारी वकील आणि पोलिसांनी मंडळाला दिली दिली.
मुलाचे मानसिकदृष्ट्या आणि व्यसनाधिनतेच्या बाबतीत अद्याप समुपदेशन सुरू आहे. मुलाची निरिक्षणगृहातून सुटका झाल्यानंतर त्याचा ताबा कोणाकडे द्यायचा हे अद्याप निश्चित झालेले नाही. अपघाताच्या दिवशीचे व्हिडिओ व्हायरल झाले असून त्यातून मुलाची ओळख सार्वजनिक झाली आहे. त्यामुळे मुलाच्या जिवाला धोका आहे. तसेच मुलाच्या महाविद्यालयीन प्रवेशाबाबतचा युक्तिवाद बचाव पक्षाकडून करण्यात आला. मात्र मुलगा निरिक्षणगृहात असताना देखील त्याची प्रवेश प्रक्रीया होवू शकते, असे विशेष सहायक सरकारी वकील मोनाली काळे अध्यक्षांच्या निदर्शनात आणून दिले.
मंडळात असलेल्या विविध तज्ज्ञांच्या माध्यमातून मुलाचे समुपदेशन सुरू आहे. मुलाला जामीन मिळाल्यानंतर या गुन्ह्याची व्याप्ती आणखी वाढली होती. या गुन्ह्यात आत्तापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली असून तपास सुरू आहे. मुलाच्या सुरक्षेच्या कारणास्तव त्याचा बालसुधारगृहात मुक्काम वाढविणे गरजेचे आहे. त्यामुळे मुलाचा निरिक्षणगृहातील मुक्काम १४ दिवस वाढविण्यासाठी अर्ज करण्यात आला होता, अशी माहिती सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांनी दिली.
अहवाल सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी…
मुलाला प्रौढ ठरवत त्यावर खटला चालवायचा असेल तर या गुन्ह्यात पोलिसांना मुलाला बाल न्याय मंडळात हजर केल्यापासून ३० दिवसांत पोलिस तपासाचा अहवाल (दोषारोपपत्र) दाखल करावे लागणार आहे. बाल न्याय (काळजी आणि संरक्षण) कायद्यात त्याबाबत नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार पोलिस तयारी करत असल्याचे त्यांनी मंडळात दाखल केलेल्या अर्जात नमूद आहे. मात्र पोलिसांनी आता अहवाल सादर करण्यासाठी १४ दिवसांची मुदतवाढ मिळावी, अशी मागणी पोलिसांनी केली आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही.